17.7 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeमहाराष्ट्र२१ तारखेपर्यंत मतदानयंत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

२१ तारखेपर्यंत मतदानयंत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

गोडाऊन बाहेर उमेदवार प्रतिनिधींनाही पहारा ठेवण्याची मुभा !

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता ३ डिसेंबर ऐवजी एकत्रितरित्या २१ डिसेंबरला होणार असल्याने मतदान यंत्रे १९ दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सीसीटीव्हीसह सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. सोबतच मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत निवडणूक लढवणा-या उमेदवारांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना गोडाऊनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी झालेल्या निवडणुकीची ३ डिसेंबरला मतमोजणी हाती घेण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे आता निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. २ तारखेला मतदान झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी १९ दिवस लांबल्याने मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. मतदानानंतर मतमोजणी तब्बल १९ दिवसानंतर होणार असल्याने सुरक्षा यंत्रणेसमोर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. या दरम्यान उमेदवारांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी त्यांनी नेमून दिलेल्या प्रतिनिधींना गोडावून बाहेरच्या मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय उमेदवारांच्या प्रतिनिधींना मागणीप्रमाणे मतदान यंत्रे ठेवलेल्या गोडावूनची पाहणी करता येईल, असे आदेशात म्हटले आहे.

मतदानोत्तर चाचण्यांना २० डिसेंबरपर्यंत बंदी
मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिका-यांना निर्देश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR