परभणी : गेल्या हंगामात तुटलेल्या उसाचे प्रतिटन उरलेले ३०० रुपये फरकाचे बिल तात्काळ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सिंगणापूर फाटा येथे २ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सोबत आणलेली चटणी भाकर आंदोलनस्थळी खाल्ली. या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गेल्या हंगामात लक्ष्मी नृसिंह, गंगाखेड जी-९ शुगर आणि श्री तुळजाभवानी या ३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन केवळ २ हजार ६०० रुपये दर दिला आहे. मात्र, उर्वरित ३०० रुपयांचा फरक अद्याप शेतक-यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. हा थकीत फरक तातडीने मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे, असे मत संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभुमीवर केकरजवळा, इटाळी, उखळगाव येथे ऊस उत्पादकांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना शेतकरी कामगार पक्षाचे रामराजे म्हाडीक, विठ्ठल चोखट, रणजित चव्हाण, नामदेव काळे यांच्यासह तीनही गावांतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
मागील हंगामातील उसाचे थकीत ३०० रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिल्यानंतर या आंदोलनाला पाठींबा मिळाला. शेतक-यांच्या मेहनतीच्या उसाचे पैसे वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क असून, थकीत रक्कम तातडीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिंगणापूर फाटा येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी एकजुटीने सहभाग नोंदविला. या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतक-यांच्या थकीत बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित साखर कारखाने आणि प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेतात याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. या रास्ता रोको आंदोलन या रास्ता रोकोला मानवत काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅड. रमेश जाधव यांनी पाठिंबा दिला. या रास्ता रोको आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















