17.6 C
Latur
Tuesday, December 16, 2025
Homeराष्ट्रीयस्फोटाचे इंटरनॅशनल कनेक्शन!

स्फोटाचे इंटरनॅशनल कनेक्शन!

एनआयए चौकशीला वेग, मंत्रिमंडळ बैठकीत स्फोटाचा निषेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असून, या तपासाला वेग आला आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, दिल्ली बॉम्बस्फोटाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटांचा संबंध तुर्कीशी असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टमध्ये ते तुर्कीला गेल्याची माहिती आहे. तुर्कीत नेमके कुणाला भेटले, याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत बॉम्बस्फोटांचा निषेध करणारा आणि जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केला. या बैठकीत दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीवर आणि सुरक्षा संस्थांच्या अहवालांवर चर्चा झाली. यानंतर केंद्र सरकारने १० नोव्हेंबर रोजी देशविरोधी शक्तींनी केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा देश साक्षीदार आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले. यामुळे गुन्हेगार, साथीदार आणि त्यांच्या मागे असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे, असे स्पष्ट केले. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांची अर्धातास स्वतंत्र चर्चा
मंत्रिमंडळ समितीच्या या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक सुमारे अर्धातास चालली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त
फरिदाबाद पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त केली. डीएल १० सीके ०४५८ क्रमांकाची कार खंदावली गावाजवळ सापडली. आता ही कार फॉरेन्सिक तपासासाठी पाठविली आहे. ही कार उमर उन नबी ऊर्फ उमर मोहम्मदच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. प्रमुख संशयितांत उमरचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR