इस्लामाबाद : पाकिस्तानात नवीन सरकार येताच जुन्या इम्रान सरकारविरोधात कारवाई सुरू झाली आहे. लष्करप्रमुख आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवल्याबद्दल इम्रान खान यांच्या पक्षाच्या ८ सोशल मीडिया कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने (एफआयए) मंगळवारी पंजाबच्या विविध भागांतून त्यांना अटक केली.
९ एप्रिल रोजी उशिरा इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून सोशल मीडियावर लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात मोहीम चालवली जात होती. सोशल मीडिया मोहिमेत सहभागी असलेल्या ५० जणांची यादी मिळाली होती, त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली.