नवी दिल्ली : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या अनुद्गारांचा निषेध करताना मुसलमान देशांच्या इस्लामिक सहयोग संघटनेने (ओआयसी) काढलेल्या निवेदनावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे निवेदन अनुचित आणि संकुचित मानसिकतेतून काढलेले असून भारतात सर्व धर्मांचा व त्यातील पूजनीय व्यक्तींचा कायम सन्मान होत आलेला आहे असे भारताने खडसावले आहे.
दरम्यान नुपूर शर्मा हिच्या वक्तव्याचा निषेध करणा-या देशांची संख्या १० झाली असून कतारचा निषेधाचा आवाज सर्वात मोठा आहे. भारताचा तिस-या क्रमांकाचा व्यापार मित्र, संयुक्त अरब अमीरातीनेही शर्मा हिच्या उद्गारांचा निषेध केला आहे त्याचवेळी या देशाने तिच्यावर सत्तारुढ भाजपने केलेल्या कारवाईचे स्वागत देखील केले आहे. दुसरीकडे बांगला देश, मलेशिया, इराक, इंडोनेशिया या मुस्लिम देशांनी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही प्रतीक्रिया दिलेली नाही. आखाती देशांशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध असून या देशांत कोट्यवधी भारतीय कामगार कामाला आहेत.
ते तेथून लाखो डॉलर भारतात पाठवत असतात. त्यामुळे नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधाची धग भारताच्या परस्पर संबंधांपर्यंत पोहोचण्याची स्थिती निर्माण झाल्यावर सरकार दरबारात मोठी अस्वस्थता आहे. विदेश मंत्रालयाच्या गोटातही त्याचे पडसाद उमटत आहेत. उपराष्ट्रपती वैेंकय्या नायडू सध्या कतारच्या व्यापार मैत्री दौ-यावर असून त्यांचा दौरा सुरू असतानाच हे वादळ उठल्याने त्याचे गंभीर परिणाम भारताला जाणवू लागले आहेत. मात्र ओआयसीच्या निवेदनातील भाषेवर भारताने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.