नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लॉस एलमाऊ येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेत भाग घेतला. दरम्यान परिषद सुरू होण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधितदेखील केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी गरीब देश पर्यावरणाचे जास्त नुकसान करतात, हा गैरसमज आहे, असे जागतिक देशांना सुनावले.
जी-७ शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा १००० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास या गैरसमज किंवा दृष्टिकोनाचे पूर्णपणे खंडन करतो. भारताने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी कधीही कमी पडू दिली नाही. जगातील १७ टक्के लोकसंख्या भारतात राहते. मात्र, जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचे योगदान केवळ ५ टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आमची जीवनशैली.
पीए मोदी म्हणाले की, ऊर्जा ही केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, तर एका गरीब कुटुंबाचाही उर्जेवर समान अधिकार असतो. आम्ही भारतात घरोघरी एलईडी बल्ब आणि स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला आहे आणि गरिबांसाठीदेखील उर्जेचे पर्याय उपलब्ध करत अनेक दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते, हे दाखवून दिले आहे.