23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजवाहिरीचा खातमा झाला, जगाने नि:श्वास सोडला!

जवाहिरीचा खातमा झाला, जगाने नि:श्वास सोडला!

एकमत ऑनलाईन

विश्लेषण

अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनला मदत करणा-या अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरीचा अखेर अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ल्याद्वारे खातमा केला.

९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणा-या अल जवाहिरीने अल-कायदाचे अस्तित्व कायम राहील आणि त्याची पाळेमुळे जगभरात पसरतील यासाठी प्रयत्न केले. महत्वाचे म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर ११ महिन्यातच ही कारवाई करत मोठे यश मिळवले.

९/११ हल्ल्यानंतर तब्बल २१ वर्षांपासून अमेरिका अल जवाहिरीचा शोध घेत होती. अमेरिकेवर झालेल्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर अमेरिकेची स्थिती आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यात फार मोठा बदल झाला होता.
मूळचा इजिप्तचा असलेल्या अल जवाहिरीचा जन्म १९ जून १९५१ मध्ये कैरो उपनगरात झाला. अल जवाहिरी लहानपणासूनच फार धार्मिक होता. इस्लामिक शासनाचा संदर्भ देत इजिप्त आणि इतर अरब राष्ट्रांमधील सरकारे बदलण्याचा प्रयत्न करणा-या सुन्नी इस्लामिक पुनरुज्जीवनाच्या शाखेत अल जवाहिरी सहभागी होता.

अल जवाहिरीने तरुणपणी नेत्रचिकित्सक म्हणून काम केले. त्याने मध्य आशिया आणि मध्य पूर्व भागांचा दौरा केला, जिथे त्याने अफगाणिस्तान-सोव्हिएत युद्ध पाहिले. सोव्हिएत सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अफगाणिस्तानला मदत करण्याच्या हेतूने त्याने ओसामा बिन लादेन आणि इतर अरब दहशतवाद्यांची भेट घेतली.

१९८१ मध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी अध्यक्ष अन्वर सादात यांची हत्या केल्यानंतर इजिप्तमध्ये अटक करुन तुरुंगात छळ झालेल्या शेकडो अतिरेक्यांमध्ये अल जवाहिरीचाही समावेश होता. या अनुभवाने तो अधिक कट्टर झाला. अल जवाहिरीने आपला इजिप्तमधील दहशतवादी गट अल-कायदामध्ये विलीन केला. इजिप्तमध्ये अंडरग्राऊंड राहून आणि गुप्तचर यंत्रणांना चकवा देत अल जवाहिरीने अल-कायदाला संघटनात्मक कौशल्य आणि अनुभव दिले. यामुळे अल कायदा आपले गट निर्माण करु शकला आणि जगभरात हल्ले केले.

अल जवाहिरी महत्वाचा का?
अल जवाहिरीने ९/११ हल्ल्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांना एकत्र आणले होते. योजना आखण्याचे आणि निधी जमावण्याचे कामही त्याच्याकडे होते. ९/११ नंतर आणखी एक हल्ला करण्यासाठी त्याने संघटनेला कोणतेही नुकसान होणार नाही याची खातरजमा केली होती. ९/११ हल्ल्यानंतर फरार झालेल्या अल जवाहिरीने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अल कायदाचे नेतृत्व नव्याने उभे केले. ९/११ नंतरही अल-कायदाने जवळच्या आणि दूरच्या शत्रूंना लक्ष््य करत बाली, मोम्बासा, रियाध, जाकार्ता, इस्तंबूल, लंडन यासह इतर ठिकाणी अनेक हल्ले केले.
२००५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या हल्ल्यात ५२ लोक मारले गेले होते. अल-कायदाने केलेला हा पश्चिमेकडील शेवटचा हल्ला होता. कारण अमेरिकेसह इतरांनी केलेले ड्रोन हल्ले, दहशतवादविरोधी छापेमारी आणि क्षेपणास्त्रे यामुळे अल-कायदाशी संबंधित अनेक दहशतवादी मारले गेले, आणि त्यांचे नेटवर्कही उद्ध्वस्त झाले.
अल जवाहिरीला ठार कसे केले?
रविवारी पहाटेच्या वेळी अल जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील घराच्या बाल्कनीत आला होता. अल जवाहिरी रोज बाल्कनीत येत असल्याचे आणि काही वेळ तिथेच थांबत असल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आले. अमेरिकेच्या एका अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, अल जवाहिरी बाल्कनीत उभा असताना ड्रोनच्या सहाय्याने दोन हेलफायर मिसाइल्सने हल्ला करण्यात आला. बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती.

ख-या अर्थाने न्याय मिळाला : बायडन
जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. ‘‘कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार,’’ असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला.

सैफ अल-अदेल जवाहिरीचा उत्तराधिकारी
अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर अल-कायदाचा उत्तराधिकारी म्हणून सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. सैफ अल अदेल हा पूर्णपणे लष्करी प्रशिक्षित कार्यकर्ता मानला जातो.

तालिबान खवळला…!
अमेरिकेच्या या कारवाईनंतर अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान सरकारने निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे आणि दोहा कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेने केलेली कारवाई, ही दोन्ही देशांच्या हितविरोधी आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणे दोन्ही देशातील संबंध बिघडवू शकतात, असेही तालिबानने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतात हल्ल्याची शक्यता
भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. अल-कायदा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असते. त्यामुळे या संघटनेचे जे स्लिपरसेल्स आहेत, त्यांना सक्रिय करण्याचे आदेश अल-कायदा देऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या