टोरोंटो : कॅनडात टोरोंटो येथे एका २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांची एका अज्ञात हल्लेखोराने गोळ््या घालून हत्या केली. येथील भुयारी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी ही घटना घडली. कार्तिक वासुदेव असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या हत्येविषयी शोक प्रकट करताना सांगितले, की या दुर्दैवी घटनेने खूप धक्का बसला असून, कार्तिकच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. कार्तिक गुरुवारी संध्याकाळी सेंट जेम्स भागातील शेरबोर्न टीटीसी रेल्वे स्थानकाच्या ग्लेन रस्त्यावरील प्रवेशद्वारापाशी पोहोचला, तेव्हा त्याच्यावर हा गोळीबार झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना यश आले नाही.