25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय कापसाला सोन्याची झळाळी

भारतीय कापसाला सोन्याची झळाळी

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील कापूस उत्पादक शेतक-यांच्या पांढ-या सोन्याला दमदार भाव मिळणार अशी चिन्हे आहेत. अमेरिकेत मुख्यत: कापूस लागवड होणा-या टेक्सास, कॅलीफोर्निया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज कॉटन मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेकडून होणा-या निर्यातीचे प्रमाण कमी होवून, भारताला ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतक-यांना दमदार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला विक्रमी भाव मिळाला. अतीवृष्टीमुळे नुकसान होवूनही, शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला होता.

यंदा देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेने भारतात देखील कापसाचा पेरा वाढला आहे. त्यात सध्यातरी अनेक भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कापसाची स्थिती चांगली आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकपटीने वाढणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांना चांगला भाव मिळणार असून, पहिल्याच मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ११ हजार १७५ रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे.

अमेरिकेचा दुष्काळ कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर

१. अमेरिका जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश असून, या देशात सुमारे २ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन केले जाते. तसेच या सर्व मालाची अमेरिकेकडून निर्यात केली जाते.
२. अमेरिकेतील टेक्सास, कॅलीफोर्निया या मोठ्या राज्यांमध्ये देशातील एकूण कापूस लागवडीच्या सुमारे ५० टक्के उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा याच राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे.
३. दुष्काळामुळे अमेरिकेच्या कापूस उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणा-या निर्यातीमध्ये घट होणार आहे.
४. अशा परिस्थितीत चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे.

सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देश
चीन – ५ कोटी गाठी
भारत – ३ कोटी ५० लाख गाठी
अमेरिका – २ कोटी ५० लाख गाठी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या