न्यूयॉर्क : क्रिप्टोकरन्सीचा बाजार सध्या वेगवेगळ्या गोष्टींशी सामना करीत आहे. एक गंमत म्हणून सुरु झालेल्या या करन्सीचे मूल्य वेगाने वाढले आणि घटले आहे. विशेषत: टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी प्रोमोट केल्यानंतर त्याचे मूल्य वाढले होते. एका डोजकॉईनच्या गुंतवणुकदाराने मस्क आणि त्यांच्या कंपनीवर २५८ अब्ज डॉलरची (जवळपास २०,१३६ अब्ज रुपये) नुकसान भरपाईचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. केथ जॉन्सन नावाच्या व्यक्तीने टेस्ला आणि स्पेसएक्ससह मस्कवर खटला दाखल केला.
जॉन्सन म्हणाले, की त्यांनी डोजकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे गमावले आहेत. केथ जॉन्सन यांनी स्वत:ला अमेरिकन नागरिक म्हटले असून स्वत:ची फसवणूक झाली असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावावर त्यांच्याबरोबर डोजकॉईन क्रिप्टो पिरॅमिड योजनेत फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी त्यांनी मस्कविरोधात न्यूयॉर्क न्यायालयात दावा दाखल केला. जॉन्सनच्या म्हणण्यानुसार ते वर्ष २०१९ पासून डोजकॉईनमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचे नुकसान झाले.
गुंतवणूकदारानुसार मस्क यांनी प्रोमोट केल्यानंतर त्यांना ८६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. केवळ ही भरपाईच नव्हे, तर जॉन्सन आपल्या नुकसानीच्या दुप्पट रक्कम वेगळी मागत आहेत. ती १७२ अब्ज डॉलर इतकी अतिरिक्त रक्कम म्हणजे एकूण २५८ अब्ज डॉलर मागत आहेत.