22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमंगळावर पाण्यानंतर आता शास्त्रज्ञांचे शेतीचे नियोजन

मंगळावर पाण्यानंतर आता शास्त्रज्ञांचे शेतीचे नियोजन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील अनेक संस्था मंगळ ग्रहावर मानव मोहीम पाठवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असून, त्याअनुषंगाने संशोधनही सुरू आहे. यापैकीच एक म्हणजे मंगळावर शेती विकसित करणे.

मंगळावर पोहोचण्यासाठी काही महिने लागतील आणि अशा परिस्थितीत इतक्या वेळासाठी पृथ्वीवरुन अन्न घेऊन जाणे शक्य होणार नाही. एका नवीन अभ्यासानुसार शास्त्रज्ञांनी असे एक रोप शोधले आहे, जे मंगळ ग्रहावर सर्वप्रथम पिकवता येऊ शकेल.

मंगळावर पीक घेणे कठीण
नासा या दिशेने गंभीररित्या संशोधन आणि प्रयोग करत आहे. पण, मंगळावर पीक घेणे हे काही सोपे काम नाही. तिथल्या धूळ आणि मातीमध्ये ना सेंद्रिय पदार्थ आहेत, ना उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. याशिवाय, तिथली माती मीठ आणि खनिजांनी भरलेली आहे, ज्यामुळे तेथे बहुतेक झाडे जगणे कठीण होईल.

एल्फल्फा वनस्पतीमध्ये यावरील उपाय
नवीन अभ्यासात, एल्फाल्फा वनस्पतींमध्ये याचा उपाय शोधण्यात आला आहे. मंगळावरील ज्वालामुखीच्या कणखर जमिनीतही अन्न प्रदान करणारे हे पीक वाढू शकेल, असे संशोधकांना आढळून आले. इतकेच नाही तर यानंतर याचा वापर सलगम, मुळा आणि सलाड पाने उगवण्यासाठी खत म्हणून करता येईल.

संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधात असे लिहिले आहे की, मंगळाच्या मातीत कमी पौष्टिकता आहे आणि त्याचवेळी जास्त क्षारयुक्त पाणी असल्याने ते पीक घेण्यास अयोग्य ठरते. त्यामुळे दीर्घ मोहिमांसाठी तेथे अशा पद्धतीने काम करणे आवश््यक आहे की मंगळावरील मातीचे पोषण वाढेल आणि तेथील पाण्यातील क्षार कमी होतील.

यापूर्वीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, मंगळावरील मातीत अतिरिक्त पोषक तत्वे मिसळले तरी तिथे पीक घेणे अत्यंत कठीण असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत एल्फल्फा मोठी भूमिका बजावू शकते. वेगवेगळ्या बियांवर चाचणी करण्यापूर्वी मंगळाच्या मातीसारखी माती मिळवणे खूप कठीण होते, म्हणून संशोधकांनी सर्वात अचूक अशा मातीवर प्रयोग केले. त्यात असे आढळून आले की ज्या प्रकारे एल्फल्फा पृथ्वीवर वाढतो, त्याचप्रमाणे मंगळावर त्याची रोपे खताशिवाय वाढू शकतात.

तीन उपयुक्त वनस्पती
संशोधकांनी मंगळाच्या मातीत खत घालून एल्फल्फा वाढवूनही पाहिले आहे. याशिवाय, संशोधकांना असेही आढळून आले की, सलगम, मुळा आणि सलाडसाठी वापरण्यात येणारे पालेभाजी या वनस्पती मंगळाच्या सिम्युलेटेड मातीमध्ये वाढू शकतात आणि त्यांना जास्त पाणी आणि जास्त देखभाल करण्याचीही आवश््यकता नाही.

पण या सगळ्यात एक अडचण अशी आहे की, त्यांना वाढण्यासाठी स्वच्छ पाणी लागेल. परंतु संशोधकांना वाटते की मंगळावर उपलब्ध असलेल्या खारट पाण्यावर एका प्रकारच्या समुद्री जीवाणुंनी प्रक्रिया केली जाऊ शकते आणि ज्वालामुखीच्या खडकांमधून फिल्टर करून पिकांसाठी शुद्ध पाणी तयार केले जाऊ शकते.

मंगळावर माती कशी सापडेल हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण, मंगळाच्या मातीची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही. याव्यतिरिक्त, शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेल्या सिम्युलेटेड मातीमध्ये विषारी पर्कोलेटेड मीठासारखे कोणतेही पदार्थ नव्हते, पण मंगळावरील मातीत ते असू शकतात ज्याला स्वच्छ करण्याची आवश््यकता भासू शकते. एल्फाल्फाच्या उत्पादनामुळे मंगळाच्या प्रवासातील एकाच वेळी अनेक समस्या कमी होऊ शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या