बीजिंग: वृत्तसंस्था
अमेरिकेने दिलेल्या धमकीला भीक न घालता चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये मागील काही दिवसांपासून या विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. हा कायदा मंजूर होऊ नये, यासाठी अमेरिकेनेही चीनला धमकी दिली होती. मात्र, चीनने त्याकडे दुर्लक्ष करून विधेयकाला मंजुरी दिली.
चीन सरकारने मंजूर केलेले हाँगकाँग सुरक्षा विधेयक हे हाँगकाँगच्या स्वायत्तेवर आणि लोकशाही मूल्यावर घाला असल्याचा आरोप या कायद्याच्या विरोधकांनी केला आहे. मात्र, आज पार पडलेल्या चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने या विधेयकाला मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने २८७८ मते पडली़ तर एका सदस्याने याला विरोध दर्शवला. या दरम्यान सहा सदस्य अनुपस्थित होते. येत्या काही दिवसांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची शक्यता आहे. या कायद्याला होत असलेला विरोध पाहता चीनने हाँगकाँगमधील आरोपींचे चीनमध्ये हस्तांतरण करण्यात येणार नसल्याचे चीन सरकारने स्पष्ट केले आहे. या कायद्यातंर्गत आरोपींवर हाँगकाँगमध्येच खटला चालवण्यात येणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
Read More औरंगाबाद, जालन्यात ६२ नवे कोरोनाबाधित रूग्ण
दरम्यान, हाँगकाँग सुरक्षा कायदा चीन मंजूर करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही मोठा निर्णय घेतला. हाँगकाँगला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. यामुळे हाँगकाँगला आता कोणतीही विशेष सवलत नसेल. चीनसाठी लागू असणारा कायदाच हाँगकाँगलाही लागू होईल. परिणामी वित्तीय केंद्र असलेल्या हाँगकाँगमधून गुंतवणूक बाहेर जाऊन याचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे.