सिडनी : ऑस्ट्रेलिया दौ-याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पीएम मोदी म्हणाले आम्ही दोघांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर सातत्याने होणा-या हल्ल्यांबाबत चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध बिघडतील अशी कोणतीही कृती आम्ही खपवून घेणार नाही. यावेळी पंतप्रधान अल्बानीज यांनी अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
मोदी म्हणाले गेल्या एका वर्षात अल्बानीज यांच्यासोबत माझी ही सहावी भेट आहे. यावरून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध किती जवळचे आहेत. हे सिद्ध होते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर दोन्ही देशांमधील संबंध टी २० सारखे झाले आहेत. पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड हर्ले यांचीही भेट घेतली.
अल्बानीज यांना भारत भेटीचे निमंत्रण
पंतप्रधान मोदींनी अल्बानीज आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या विश्वचषकासाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले- विश्वचषकासोबतच भारतात दिवाळीचा मोठा सणही साजरा केला जाईल. या काळात पंतप्रधान अल्बानीज यांनी भारताला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली
पत्रकार परिषदेत, पीएम अल्बानीज म्हणाले की, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या दृष्टीने दोन्ही देशांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया बंगळुरूमध्ये वाणिज्य दूतावास उघडेल. याआधी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये जी २० व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात लष्करी सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली.