जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी जागतिक आरोग्य परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अद्यापही जगाने कोरोनापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
जगभरातील १९४ देशांचा सहभाग या परिषदेत आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थितीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी भाषण देताना गेब्रेयसस यांनी मागील दोन वर्षांमध्ये जगाने शतकातील सर्वात मोठ्या आरोग्य समस्येला तोंड दिल्याचा उल्लेख केला. त्यांनी आतापर्यंतची परिस्थिती, भविष्यातील आव्हान आणि सध्या अनेक देशांमध्ये उठवण्यात आलेल्या निर्बंधांचा उल्लेखही केला.
सर्वात कमी लसीकरण झालेल्या आफ्रिका सारख्या खंडामध्ये कोरोना मृतांची संख्या वाढत असल्याचा उल्लेखही यावेळी गेब्रेयसस यांनी केला. खरे तर अजूनही आपण हा विषाणू या पुढे कसा आणि किती वेगाने पसरेल हे सांगू शकत नाही, असा इशारा गेब्रेयसस यांनी दिलाय. जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगतानाच कमी उत्पन्न असणा-या देशांमधील एक बिलियन लोकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही, असेही गेब्रेयसस म्हणाले. जोपर्यंत कोरोनाचा सर्व ठिकाणांहून नाश होत नाही तोपर्यंत तो संपला असे म्हणता येणार नाही. जगातील केवळ ५७ देशांमधील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी सर्वच देश हे सधन देश आहेत,असेही गेब्रेयसस म्हणाले.
साथ अचानक संपणार नाही
अनेक देशांत निर्बंध उठवले आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यासारखे वाटते आहे, पण तसे नाही. अनेक देशांमध्ये आजही लसीकरण हे ७० टक्क्यांहून कमी आहे, असा उल्लेख गेब्रेयसस यांनी केला. जगातील ७० देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या चाचण्यांची संख्या जगभरामध्ये कमी झाल्याचे दिसून येत आहे, असेही गेब्रेयसस म्हणाले. जागतिक साथ अचानक गायब होणार नाही. मात्र आपण तिला संपवू शकतो. जागतिक स्तरावर ७० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट सर्वांनी एकत्र मिळून पूर्ण करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.