वॉशिंग्टन : जगातील सर्वात बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी बिडेन यांच्या डेलावेअरमधील घरावर एका छोट्या खासगी विमानाने उड्डाण घेतल्याची घटना घडली. महत्वाचे म्हणजे, बायडेन यांच्या घराचा परिसर नो फ्लाय झोन आहे.
व्हाईट हाऊसच्या एका अधिका-याने या घटनेबाबत माहिती दिली. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन सुट्टीसाठी या घरी आले होते. सध्या दोघेही सुरक्षित असून, कोणतीची चुकीची घटना घडलेली नाही. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांना एका सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
चुकून नो फ्लाय झोनमध्ये विमान आले
राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गुप्तहेर विभागाने सांगितले की, हे खासगी विमान चुकून सुरक्षित क्षेत्रात घुसले. विमान या क्षेत्रात घुसल्यानंतर तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आले. या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असून, सर्वकाही ठिक असल्याची माहिती व्हाईट हाउसच्या अधिका-याने दिली.