न्यूयॉर्क : सोशल मीडियातील दिग्गज कंपनी असलेल्या फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिल्ली हिंसाचारावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर तोफ डागली आहे. दिल्लीमध्ये सीएए विरोधी प्रदर्शन करत असलेल्या नागरिकांविरोधात दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी अत्यंत भडक वक्तव्ये करून हिंसाचाराला खतपाणी घातले होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हिंसाचारात दिल्ली तब्बल तीन दिवस जळत होती, तर ५० हून अधिक जणांचा बळी गेला होता.
या घटनेवरून फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी केलेल्या वक्तव्याचा आॅडिओ लीक झाला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिस आणि दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा पुन्हा चर्चेत आले आहेत. झुकेरबर्ग फेसबुक कर्मचाºयांशी संवाद साधत असताना घेतलेल्या निर्णयांचा तसेच जगभरातील घटनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचाही दाखला दिला.
यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कार्यवाही का केली नाही याचाही खुलासा केला. ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य अधिक सतर्क होण्याइतपत भडकावू नसले, तरी काळजी करण्याइतपत असल्याचे ते म्हणाले. झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा आढावा घेतला.
हिंसाचाराला उत्तेजन न देणे आपले धोरण
हिंसाचाराला उत्तेजन न देणे हे आपले धोरण आहे. त्याबाबत अनेक स्पष्ट उदाहरणे आहेत. जगभरातील अनेक सरकारी अधिकाºयांची उदाहरणे आहेत जी आपण डिसेबल केली आहेत़ अशाच प्रकारे काही घटना भारतामध्येही घडल्या. उदाहरण म्हणून सांगायच झाल्यास कोणीतरी म्हणाले होते की, पोलिस कारवाई करणार नसतील, तर आमचे कार्यकर्ते तेथे जाऊन रस्ता मोकळा करतील. झुकेरबर्ग यांनी फेसबुकच्या जवळपास २५ हजार कर्मचाºयांसमोर वरील मते व्यक्त केली.
म्हणूनच भाषणाचा व्हिडिओ डिसेबल केला
झुकेरबर्ग पुढे म्हणाले की, अशा प्रकारे कार्यकर्त्यांना उसकल्याने मार्ग अधिकच प्रशस्त होतो. त्यामुळे हा भडकावू भाषणाचा व्हिडिओ आपण डिसेबल केला. आपल्याकडे असा अधिकारिक निर्णय आहे. कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी भडकावू भाषणाचा व्हिडिओ ट्रम्प यांच्या भारत दौºयापूर्वी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्याच व्हिडिओचा संदर्भ झुकेरबर्ग यांनी दिला आहे.
त्या व्हिडिओमधून अत्यंत जहाल भाषा कपिल मिश्रा यांनी वापरली होती. जोपर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारतात आहेत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी काही करणार नाही. त्यानंतर रस्ता मोकळा झाला नाही, तर आम्ही पोलिसांचे (दिल्ली पोलिस) ऐकणार नाही. हा व्हिडिओ जाफराबादमधील होता. यानंतर झालेल्या हिंसाचारात ५० जणांचे निष्पाप बळी गेले होते. तब्बल तीन दिवस दिल्लीत हिंसाचार सुरु होता.