नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियाने मिरर डील वर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे कीव्हला काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात पुन्हा सुरू करता येणार असून यामुळे लाखो टन धान्य निर्यात करता येणार आहे, जे सध्या युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे अडकून पडले आहे. रशियाच्या २४ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर जगभरातील युक्रेनियन धान्याच्या कमतरतेमुळे लाखो लोकांना उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे.
करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दोन्ही देशातील नेते तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये स्वाक्षरी समारंभात सहभागी झाले होते. मात्र, करारावर स्वाक्षरी करताना दोन्ही देशांचे नेते एका टेबलावर न बसता वेगवेगळ्या टेबलावर बसले होते. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी प्रथम मॉस्को करारावर स्वाक्षरी केली, त्यानंतर युक्रेनचे पायाभूत सुविधा मंत्री ओलेक्झांडर कुब्राकोव्ह यांनी कीव्ह करारावर स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत इस्तंबूलमध्ये एक समन्वय आणि देखरेख केंद्र स्थापन केले जाणार आहे. ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र, तुर्की, रशियन आणि युक्रेनियन अधिकारी असतील. दोन्ही पक्ष सहमत असल्यास त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
गहूवर आधारीत उत्पादने स्वस्त होणार?
युक्रेनच्या धान्य नाकेबंदीमुळे जागतिक अन्न संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे ब्रेड आणि पास्ता यांसारखी गहू-आधारित उत्पादने अधिक महाग झाली आहेत. तसेच खाद्या तेल आणि खतांच्याकिंमतीही गगनाला भिडल्या आहेत. कारण, युक्रेन हा जगातील चौथा सर्वात मोठा धान्य निर्यातदार देश असून, सर्वसाधारणपणे येथे जगातील ४२% सूर्यफूल तेल, १६% कॉर्न आणि ९% गव्हाचे उत्पादन केले जाते.