लंडन : सध्या जगभर लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. अशात लशीचे काही साईड इफेक्ट समोर येत आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड ऍस्ट्राजेनेका ची लस घेतल्यानंतर ३० जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या असून, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटरने माहिती दिली आहे.
एस्ट्राझेन्काच्या लसीबाबत याआधीही युरोपातील काही देशांतून तक्रारी आल्या होत्या. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी जगभरातील देशांना ऍस्ट्राजेनेकाची लस वापरणे सुरु ठेवण्यासाठी शिफारस केली. मात्र, लसीबाबत अनेक देशांनी नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि ऍस्ट्राजेनेका यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले होते. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गाठी किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच आरोग्य संघटनेने देखील ऍस्ट्राजेनेकाला क्लीन चिट देत सांगितले होते की, लस आणि रक्ताच्या गाठी याचा संबंध असलेली एकही केस आढळलेली नाही. मात्र, नागरिकांना त्रास जाणवू लागल्याने फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने ऍस्ट्राजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असे म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होत असल्याची तक्रार केली आहे.
वाझेंच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ