बीजिंग : लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असतात. या भागात सीमारेषा निश्चित नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधीलभारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सॅटेलाइट फोटोंमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा दावा करण्यात आला होता. परंतु आता या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना आपल्याच जमिनीवर बांधकाम केले असल्याचे सांगत चीनने सुनावले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. असे असले तरी अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा सातत्याने चीनकडून करण्यात येत आहे.
जंगनान क्षेत्रावरील (दक्षिण तिबेट) चीनची स्थिती स्पष्ट आणि स्थिर आहे. आम्ही कधीही तथाकथित अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. आम्ही आमच्या भूभागावर चीनची विकासकामे करणे आणि बांधकाम करणे सामान्य आहे. हे आमचे क्षेत्र आहे त्यामुळे दोष देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
सॅटेलाइट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवले असल्याचे दिसत आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, हे सॅटेलाइट फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजीचे असल्याचेही म्हटले जात आहे. याबाबत तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी जा छायाचित्रांना दुजोरा दिला. तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.
लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक