वेलिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने २८ जूनला अवकाशात सोडलेल्या ‘कॅपस्टोन’ या उपग्रहाने पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पुन्हा एकदा मानवाला उतरविण्याची मोहिम ‘नासा’ने आखली असून या उपग्रहाचे प्रक्षेपण हा त्याचाच एक भाग आहे.
‘रॉकेट लॅब’ या कंपनीने त्यांच्या ‘इलेक्ट्रॉन’ रॉकेटद्वारे मायक्रोओव्हनच्या आकाराचा ‘कॅपस्टोन’ हा उपग्रह सहा दिवसांपूर्वी न्यूझीलंडमधून अवकाशात सोडला होता. उपग्रहाचे वजन ५५ किलो आहे.
ऊर्जेचा कमीत कमी वापर करून हा उपग्रह चंद्रापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या मोहीमेची अंमलबजावणीही तितकीच अवघड आहे. त्यामुळेच आज उपग्रहाने पृथ्वीची कक्षा यशस्वीपणे ओलांडताच ‘रॉकेट लॅब’च्या संशोधकांनी जल्लोष केला.
या मोहिमेसाठी केवळ तीन कोटी २७ लाख डॉलर खर्च येणार आहे. त्यामुळे ‘नासा’च्या या मोहीमेमुळे अवकाश संशोधन क्षेत्रातील नवे युग सुरु होण्याची आशा ‘रॉकेट लॅब’चे संस्थापक पीटर बेक यांनी व्यक्त केली. ही मोहीम यशस्वी झाल्यास शुक्र, मंगळ आणि इतर कोणतीही अवकाश मोहीम अत्यंत कमी खर्चात करता येईल, असे बेक म्हणाले.