बीजिंग : चीनने तैवानवर ताबा मिळवण्यासाठी ब्लू प्रिंट जारी केली आहे. त्यासाठी त्याला किनारपट्टीचा प्रदेश फुजियान आणि तैवानमधील अंतर कमी करायचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समिती आणि राज्य परिषदेने तैवानवर कब्जा करण्यासाठी आणि नंतर तेथे आपली सत्ता स्थापन करण्यासाठी फुजियानला सराव क्षेत्र बनवले आहे.
बीजिंगने योजना जाहीर करण्यापूर्वी, एक चिनी विमान आणि सुमारे दोन डझन युद्धनौका तैवानजवळ दिसल्या. याशिवाय गुरुवारीही चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात आपली युद्धनौका आणि विमाने पाठवून आपली ताकद दाखवून दिली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत चिनी हवाई दलाच्या ४० विमानांनी तैवानच्या दक्षिण भागात प्रवेश केला.
पुढील वर्षी निवडणुका
चीन तैवानच्या लोकांना फुजियानमध्ये घरे आणि व्यवसाय उभारण्यासाठी व्यवस्था करेल. पुढील वर्षी जानेवारीत तैवानमध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होत असताना चीनने ही ब्लू प्रिंट जारी केली आहे.खरे तर एकीकडे चीनला आपली युद्धनौका आणि विमाने पाठवून तैवानला घाबरवायचे आहे आणि दुसरीकडे जे लोक तैवानच्या बाजूने आहेत त्यांना व्यापार आणि तोडग्याची संधी देऊन चीनमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहे.