लंडन : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून इंग्लंडला पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी आता बुरे दिन सुरु झाले आहेत. लंडनमधील न्यायालयाने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरणी केंद्रसरकारच्या न्यायालयीन लढाईला मोठे यश मिळाले आहे.
नीरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी मोदीच्या वकीलांनी नीरव मोदी यांचे मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने आत्ताच त्यांना भारत सरकारकडे सुपूर्द करु नये, अशी विनंती केली. मात्र लंडनच्या प्रत्यार्पण प्रकरण विषयक न्यायालयाने ती धुडकावून लावली. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा व संभाव्य साक्षींना फितवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे तो भारताचा गुन्हेगार आहे, असे म्हणत त्याने केलेल्या गुन्ह्यांमुळे त्याच्यासाठी मुंबईच्या आॅर्थर रोडवरील तुरुंग हीच योग्य जागा आहे, असा निर्वाळा दिला. त्याच्या वकीलांनी त्याच्या मानसिक स्वास्थ्याबाबत केलेल्या युक्तिवादाला खोडून काढताना न्यायालयाने गुन्हेगारांची गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्यांचे जसे मानसिक स्वास्थ असते, तसेच नीरव मोदीचे असल्याचे स्पष्टपणे सुनावले. त्यामुळे त्याला कोणतीही सवलत मिळणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.
एवढेच नव्हे तर मुंबईतील तुरुंगातही नीरवच्या मानसिक आजारासह सर्व आजारांवर योग्य उपचार करण्याची सोय आहे, त्यामुळे त्या तुरुंगातच त्याची रवानगी योग्य होईल, असेही सांगितले. नीरव मोदीच्या वकीलांकडून याप्रकरणात भारताचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून भारताला हवा तसा निकाल मिळविण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र न्यायालयाने हा आरोप फेटाळून लावला. नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी १३ मार्च २०१९ ला अटक केली होती. त्यानंतर दोन वर्षे ही सुनावणी सुरु होती.
गृहसचिवांच्या निर्णयावर पुढील भवितव्य
नीरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाला न्यायालयाने दिलेल्या मंजुरीचा प्रस्ताव आता इंग्लंंड सरकारच्या गृहमंत्रालयाकडे जाणार आहे. इंग्लंडच्या गृहसचिव प्रीती पटेल यांना आता त्यावर निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी अनुकूलता दर्शवली तर त्यानंतर लगेच नीरव मोदी भारतातील तुरुंगात दिसणार आहे.
सुरजेवाला, चंडी यांचेवर जागावाटपाची जबाबदारी