न्यूयॉर्क : आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती आली असल्याचे चित्र असून त्यामुळे अनेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येतंय. मेटा कंपनीनेही आता १०,००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून या कर्मचाऱ्यांना तशा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेटाने ही घोषणा मार्चमध्येच केली होती. आतापर्यंत जवळपास ५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवर न येण्याचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या काही काळात जगातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने तिच्या विविध प्लॅटफॉर्मवर आणखी १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी मेटाने नोव्हेंबर २०२२ मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या १३ टक्के इतकी होती.
या कर्मचारी कपातीनंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या २०२१ सालच्या मध्यापर्यंत जितकी होती, तितकी होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कंपनीने मोठी नोकरभरती केली होती. मेटा कंपनीने आता प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून या कपातीची माहिती दिली आहे.