नुसा दुआ (इंडोनेशिया) : जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथे जमलेल्या ‘जी-२०’ देशांच्या प्रतिनिधींची आज दोन गटांत विभागणी झालेली पहायला मिळाली. त्यामुळे कोणत्याच मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही.
विशेषत: युक्रेन युद्ध आणि त्याचे जगावरील परिणाम या मुद्यावरील चर्चेत वाद निर्माण होत असताना या परिषदेचे यजमान असलेल्या इंडोनेशियाला वारंवार एकतेचे आवाहन करावे लागत होते. ‘जी-२०’ देशांची परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठक येथे आजपासून सुरु झाली. युक्रेन युद्ध आणि त्याचे जगावरील परिणाम हाच यावेळी चर्चेचा प्रमुख मुद्दा होता.
या मुद्यावरून अनेक वेगवेगळी मते आणि भूमिका मांडल्या गेल्या. चीन आणि रशियाचा एक गट आणि युरोप-अमेरिकेचा एक गट अशी यावेळी विभागणी झालेली पहायला मिळाली. युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून प्रथमच रशियाचे परराष्ट्र मंत्री आणि पाश्चिमात्य देशांचे मंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
जगासमोर अनेक आव्हाने असून जागतिक शक्तींनी एकमेकांबद्दलचा अविश्वास दूर करून एकत्र यावे आणि आव्हानांचा सामना करावा, असे आवाहन इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्री रेत्नो मार्सुदी यांनी यावेळी केला.