न्युयॉर्क : जगभरातील कोरोनाच्या संकटाचा मोठा परिणाम मुलांवर झाल्याचे युनिसेफने म्हटले आहे. कोरोनाचा प्रभाव दीर्घकाळ कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात येईल.वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा इशारा युनिसेफने दिला आहे.
युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली आहे. कोरोना महामारीत मुलांसाठी धोक्यात वाढ झाली असून, जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. पाहणीत सध्याच्या पिढीसमोर तीन प्रकारचे धोके उद्भवले असल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड, वाढती गरिबी आणि विषमता या तीन धोक्यांचा सामना सध्याच्या पिढीला करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वाढत्या गरिबी व आर्थिक विषमतेमुळे मुलांसमोरील भविष्य अंधकारमय झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लसीकरण मोहिमेत अडथळा येणार
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा फटका लसीकरणाच्या मोहिमेवरही होण्याची शक्यता आहे. वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही युनिसेफने दिला आहे.
आरोग्य सेवांमध्ये १० टक्क्यांची गंभीर घट
कोरोना संकटाच्या काळात जगातील एकतृतीयांश देशामधील आरोग्य सेवांमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाची भीती हेच यामागील कारण असून नियमित लसीकरण, बाह्यरुग्णांची देखभाल, लहान मुलांना होणारा संसर्ग, गर्भवती महिलांसाठीची आरोग्य सेवा यावर याचा परिणाम झाला असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. जगभरातील ६५ देशांमध्ये घरोघरी जाणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटींमध्येही संसर्गाच्या भीतीने मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू