शिकागो : कोरोना विषाणूचा कहर अद्याप संपलेला नाही. अनेक देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भारतात रोज ४ हजाराहून अधिक रुग्ण आढळताना दिसत आहेत. अशातच कोरोना थेट मेंदूला धोका पोहोचवतो ही धक्कादायक माहिती समोर आली.
अलीकडेच आलेल्या नव्या वैद्यकिय अहवालानुसार, कोरोना विषाणूची काही लक्षणे १५ महिन्यापर्यंत कायम राहू शकतात. दिर्घकाळ राहणा-या लक्षणांना लॉन्ग कोविड लक्षणे म्हणून ओळखली जातात. ‘एनल्स ऑफ क्लिनिकल एँड ट्रांसलेशनल न्यूरोलॉजी जर्नल’मध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू हा आतापर्यंत श्वसनाचा आजार म्हणून ओळखला जात असला तरी त्याचा मेंदूसह शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही परिणाम होत आहे. संशोधनात शास्त्रज्ञांनी कोविड-१९ च्या मेंदूवर होणा-या परिणामांचा अभ्यास केला. यामध्ये असे आढळून आले की, संक्रमित व्यक्तीमध्ये काही आठवड्यानंतर मेंदूमध्ये सौम्य ते गंभीर सूज येण्याची समस्या आहे.
न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वुहानमधील रुग्णालयात दाखल झालेल्या २१४ कोविड-१९ संक्रमित लोकांपैकी सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे होती. यामध्ये फेफरे, स्ट्रोक यांसारखे गंभीर लक्षणे रुग्णांमध्ये दिसून आली. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, ८५ टक्के रूग्णांनी त्यांच्या तीव्र संसर्गानंतर किमान सहा आठवड्यानंतर किमान चार न्यूरोलॉजिकल समस्या नोंदवल्या. त्यामुळे लॉन्ग कोविड लक्षणे आढळली आहेत.