सियोल : जगभरात पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातही कोरोनाचा मोठा प्रमाणात फैलाव सुरु आहे.
आज (रविवार) दक्षिण कोरियामध्ये सलग पाचव्या दिवशी कोविड-१९ ची नवीन प्रकरणे कमी झाली. परंतु, गंभीर आजारी रुग्णांची संख्या जवळपास आठ महिन्यांत सर्वाधिक झाली आहे. देशात आतापर्यंत ५७,५२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशाने ५७,५२७ नवीन कोरोना संसर्गाची पुष्टी केलीये. यात परदेशातील ११० जणांचा समावेश आहे. देशातली एकूण संख्या २९,११६,८०० वर पोहोचली आहे. योनहाप वृत्तसंस्थेने कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत ६३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२,२१९ झाली आहे. तर, मृत्यू दर ०.११ टक्के आहे. याशिवाय, गंभीर आजारी रुग्णांची संख्या आदल्या दिवशी ५५७ वरून ६३६ वर पोहोचली आहे.
अमेरिकेतही कोरोनाची दहशत
कोविड-१९ बीबी.१.५ चा नवीन प्रकार यूएसमध्ये ४० टक्क्यांपर्यंत पसरला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बीक्यू आणि बीबी प्रकारांपेक्षा हा प्रकार संसर्ग पसरविण्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहे.