वॉशिंग्टन : जगभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट कहर निर्माण करीत आहे. अशावेळी एक सुखकारक बातमी आली आहे. अमेरिकेतील ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांनी स्मार्ट फोनच्या सहाय्याने केवळ ३० मिनिटात कोरोनासंसर्गाबद्दल सर्व माहिती देऊ शकणारी निदान चाचणी विकसित केली आहे. सीआरआयएसपीआर आधारित कोविड-१९ निदान पद्धतीवर हे तंत्रज्ञान आधारित असून आपल्या स्मार्टफोनचा कॅमेराच आपल्याला कोरोनासंसर्ग झाला आहे का याची क्षणातच माहिती देणार आहे.
सीआरआय एसपीआर म्हणजे काय?
सीआरआय एसपीआर बेस्ड कोविड- १९ निदान पद्धती ही कोविड १९ विषाणूच्या जनुकीय रचनेवर आधारित असते. संबंधित तंत्रज्ञान हे केवळ एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे का नाही इतकेच सांगत नसून त्या व्यक्तीमध्ये संसर्गाची पातळी किती तीव्र आहे, हेदेखील सांगू शकते.
चाचणीतील अनेक टप्पे गळणार
कोरोनाचा विषाणू हा जनुकीय रचनेच्या प्राथमिक स्तरात आरएनए स्वरुपात असतो. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानाधारित निदान पद्धतीत कोविड – १९ विषाणूचा संसर्ग जाणण्यासाठी आरएनएयुक्त विषाणूचे डीएनए (अधिक विकसित अवस्था) युक्त विषाणूमध्ये परिवर्तन होऊन त्याची वाढ झालेली असणे आवश्यक असते. त्याशिवाय ते कोविड-१९ विषाणू संसर्गाचे निदान करु शकत नाहीत. मात्र ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी शोधून काढलेल्या नवीन निदान पद्धतीत केवळ आरएनए युक्त कोविड-१९ विषाणूचेही निदान शक्य आहे. प्राथमिक अवस्थेतीलच विषाणू ओळखण्याच्या क्षमतेमुळे या निदान पद्धतीमुळे कोविड-१९ विषाणूचा संसर्ग ओळखण्याच्या निदान पद्धतीतील अनेक टप्पे टाळता येणार आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आरएनएचे डीएनएमध्ये परिवर्तन करणे व त्याची वाढ होईस्तोपर्यंत पहावी लागणारी वाट या बाबी टळणार आहेत.
मर्यादित सुविधा असलेल्या ठिकाणांसाठी वरदान
ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटच्या वरिष्ठ संशोधक जेनिफर डोना यांनी या निदान पद्धतीबाबत सांगितले. त्या म्हणाल्या की ‘या चाचणी पद्धतीत अत्यंत कमी वेळेत कोविड-१९ विषाणूचा संसर्ग व त्याची तीव्रता शोधून काढता येत असल्याने आम्हाला हे तंत्रज्ञान वरदानासारखेच आहे. विशेषत: ज्या ठिकाणी कोविड-१९ विषाणुच्या निदान चाचण्या करण्यासाठी अत्यंत मर्यादित सुविधा आहेत, तेथे ही पद्धत खूप सोयीची ठरणार आहे. तसेच जेथे वारंवार कोविड-१९ विषाणूची चाचणी करावी लागते,अशा ठिकाणीही ही पद्धत उपयुक्त ठरणार आहे.’
डोना यांना यंदाचा नोबेल पुरस्कार
डोना यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सीआरआयएसपीआर कॅस जिनोम एडिटिंग या संशोधनाबद्दल त्यांना त्यांच्या सहकाºयांसह या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
काय आहे तंत्रज्ञान ?
नव्या पद्धतीमध्ये कॅस -१३ नावाचे प्रथिन कोविड -१९ बाबत संकेत देणाºया रिपोर्टर रेणूशी संलग्न केलेले असते. एखाद्याचा स्वॅब जेव्हा या रेणूशी संपर्कात येतो व जर त्यात कोविड -१९ विषाणूचे अस्तित्व असेल तर कॅस -१३ हे प्रथिन त्या रेणूला तोडते. या क्रियेत एक प्रकाश उत्पन्न होतो. आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा अशावेळी भिंगाप्रमाणे काम करतो, ज्यामुळे हा प्रकाश आपल्याला ठळकपणे दिसून येतो. आणि संबंधित स्वॅबधारक हा कोविड पॉझिटीव्ह असल्याचे निदान करता येते, असे जेनिफर यांनी सांगितले. ही पद्धत विविध प्रकारच्या मोबाईलमध्ये जोडणे शक्य असल्याचेही त्यांचे म्हणणे असून त्यामुळे अत्यंत सहजसाध्य अशी ही निदानपद्धत ठरते, असा दावा त्यांनी केला आहे.
संशोधकांनी जेव्हा या निदानचाचणी पद्धतीचा अवलंब केला तेव्हा त्यांना निदान पॉझिटिव्ह का निगेटीव्ह हे जलद गतीने कळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्या स्वॅबमध्ये कोविड-१९ चा संसर्ग अधिक असेल तेथे तर केवळ ५ मिनिटात निदान शक्य आहे. जेथे संसर्ग तुरळक असेल तेथेही जास्तीत जास्त ३० मिनिटांचा वेळ लागू शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.