बर्लिन : जगभरात पुन्हा कोरोनाचा कहर वाढत चालला असून नवनवीन संशोधन समोर येत आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर आढळणा-या लक्षणांमध्ये दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहेत. एका नव्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोना विषाणू नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतात. परिणमी मज्जासंस्थेवरही परिणाम करु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेने हे संशोधन केले आहे. संशोधनाचा अहवाल नेचर न्युरोसायन्स या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात सार्स सीओव्ही २ (कोविड) ची घातकता वाढल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू केवळ मानवी श्वसन संस्थेवरच परिणाम करत नाही. तर मज्जासंस्थेवरही परिणाम करत आहे. गंध न येणे, चव जाणे, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या न्यूरोलॉजिक लक्षणांचा एक तृतीयांशपेक्षा जास्त व्यक्तींना त्रास होतो, असे अभ्यासात म्हटले आहे. ही सर्व लक्षणे मज्जासंस्थेशी निगडीत आहेत.
मृत्यु पावलेल्या ३३ रुग्णांचा अभ्यास
संशोधकांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा अभ्यास केला. यात २२ पुरूष व ११ महिला होत्या. या अभ्यासात श्वसन नलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागात परिक्षण करण्यात आले. या ठिकाणी कोरोनाचा सर्वात आधी संसर्ग होतो. पाहणी केलेल्या मृत रुग्णाचे मृत्यूवेळी वय ७१ होते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. संशोधकांनी सांगितले की त्यांना सार्स-सीओव्ही २ चे अनुवांशिक घटक मेंदू आणि श्वसन नलिकेच्या भागात दिसून आले. विषाणूचे कणही आढळून आले.
दिवसेंदिवस लक्षणांमध्ये वाढ
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सर्दी, खोकला आणि घशात खवखव होणे हीच लक्षणे सांगण्यात येत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर पडत गेली. काही दिवसानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गंध न येणे, चव जाणे ही लक्षणे दिसून येऊ लागली. ही कोरोनाची लक्षणे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.
राज्यातील शेतक-यांचे ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन