कोरोनाबाधितांचा शस्त्रक्रियापश्चात मृत्युदर अधिक

384

लंडन: वृत्तसंस्था
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर इतर आजारांबाबत झालेल्या शस्त्रक्रियांनंतर त्यांच्या प्रकृतीला अधिक धोका असतो, तसेच शस्त्रक्रियापश्चात त्यांचा मृत्युदरही अधिक असतो, असा अभ्यास लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठाने २४ देशांतील २३५ रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियांचा अभ्यास करून हा शोधअहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार सार्स-कोव्हिड-२ रुग्णांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रिया झाल्यास त्यांच्या प्रकृतीला सामान्य रुग्णांच्या तुलनेत अधिक धोका संभवतो. या शस्त्रक्रियांनंतरच्या ३० दिवसांमध्ये रुग्ण दगावण्याचे सरासरी प्रमाण २४ टक्के आढळून आले आहे. मात्र, शस्त्रक्रियांच्या प्रकारांवरून मृत्युदरामध्ये फरक आढळतो. यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमधील मृत्युदर १८.९ टक्के, आणीबाणीच्या परिस्थितीत शस्त्रक्रिया झाल्यास २५.६ टक्के, हर्निया, अ‍ॅपेंडाइसेक्टोमीसारख्या किरकोळ शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये १६.३ टक्के, कोलोन कॅन्सर किंवा खुब्याच्या हाडावरील शस्त्रक्रियासारख्या नाजूक परिस्थितीत २६.९ टक्के आहे.

Read More  कोविड-19 सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार – अमित विलासराव देशमुख

खरे तर अतिसामान्य शस्त्रक्रियांनंतर जीविताला धोका पोहोचण्याचे प्रमाण १ टक्क्याहून कमी असते. पण सार्स-कोव्हिड २ प्रकारच्या रुग्णांमध्ये सामान्य शस्त्रक्रिया व खूप आधीच ठरलेल्या व कमी जोखमीच्या शस्त्रक्रियांमध्येही मृत्युदर अनुक्रमे १६.३ टक्के व १८.९ टक्के आहे. यासाठी संशोधकांनी ब्रिटनमधील यापूर्वीच्या मृत्युदराचे उदाहरण दिले आहे. यापूर्वी अतिजोखमीच्या शस्त्रक्रियांनंतरच्या ३० दिवसांत रुग्ण दगावण्याचा दर १६.९ टक्के होता. तर, ५८ देशांमध्ये यापूर्वीच झालेल्या अभ्यासात तो १४.९ टक्के आढळून आला होता. यावरून कोव्हिड रुग्णांच्या जीविताला असलेला धोका अधोरेखित होत आहे.

पुरुषांना अधिक धोका
महिला बाधितांपेक्षा पुरुषांच्या जीविताला शस्त्रक्रियेनंतर अधिक धोका असल्याचेही अभ्यासात आढळले आहे. तसेच, ७० वर्षांहून अधिक व्यक्तींनाही अधिक धोका आहे.