इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्रीडा विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरशहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड झाली नसल्याने एका खेळाडूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
शोएब असे या आत्महत्येचा प्रयत्न करणा-या क्रिकेटपटूचे नाव आहे. सध्या शोएबवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील देशांतर्गत वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शोएबच्या कुटुंबातील एका सदस्याच्या माहितीनुसार, चॅम्पियनशिपच्या चाचण्यानंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही. त्यामुळे तो नैराश््यात गेला होता. नैराश््यातून त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. यावेळी त्याने स्वत:चे मनगट कापून घेतलेले दिसले. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.