26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल पाईपलाईनवर सायबर हल्ला

अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल पाईपलाईनवर सायबर हल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकेची सर्वात मोठी इंधन पाईपलाईनवर सायबर हल्ला झाला असून, देशाच्या पूर्व किनारपट्टीसाठी ४५% डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनाचा पुरवठा या पाईपलाईनद्वारे होतो. ८८५० किमी लांबीची ही पाईपलाईन दररोज २५ लाख बॅरल इंधन पुरवते. शुक्रवारी झालेल्या सायबर हल्ल्यानंतर इंधन पाईपलाईन आॅपरेटरने आपले सर्व नेटवर्क बंद केले आणि सेवा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जगभरात तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे तेलाच्या किमती २ ते ३ टक्क्यांनी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर यास जास्त वेळ लागला तर परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. तेल बाजारपेठेचे स्वतंत्र विश्लेषक गौरव शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, टेक्सासच्या रिफायनरीजमध्ये मोठ्या प्रमाणात तेल अडकले आहे. मंगळवारपर्यंत परिस्थिती सामान्य न झाल्यास मोठे संकट उद्भवू शकते. या घटनेचा भारतावरही परिणाम होईल, असा विश्वास आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबरोबरच गॅसच्या किमतीतही वाढू शकतात.

कच्चे तेल भडकले
या सायबर हल्ल्यानंतर सोमवारी ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत वाढताना दिसत आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाईटवर संध्याकाळी ३ वाजता ब्रेन्ट क्रूड ०.२८ डॉलर वाढीसह ६८.५६ डॉलरवर व्यापार करीत होता. आजच्या व्यापारादरम्यान क्रूड प्रति बॅरल ६९.१९ डॉलरच्या पातळीवर पोहोचले होते. यावेळी डब्ल्यूटीआय क्रूड ०.२९ डॉलरच्या तेजीसह वाढून ६५.१९ डॉलरवर व्यापार करीत आहे. आज पुन्हा एकदा ते प्रति बॅरल ६५.७५ च्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डब्ल्यूटीआय ६८ डॉलर आणि ब्रेंट क्रूड ७३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचू शकेल. कच्च्या तेलाच्या किमतीत एका डॉलरच्या वाढीमुळे पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ५५ पैसे, तर डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाली.

इमर्जन्सी कायदा
दरम्यान, अमेरिकन सरकारने आपत्कालीन कायदा केला आहे. त्याअंतर्गत रस्त्याने इंधन वाहतूक करण्याच्या नियमांना सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, १८ प्रांतांमध्ये पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि इतर पेट्रोलियम पदार्थ वाहून नेताना निर्धारित वेळेपेक्षा ड्रायव्हर्स जास्त काम करू शकतात. या राज्यांमध्ये अलाबामा, आर्कान्सा, कोलंबिया जिल्हा, डेलावेर, फ्लोरिडा, जॉर्जिया, केंटकी, लुईझियाना, मेरिलँड, मिसिसिप्पी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया, दक्षिण कॅरोलिना, टेनेसी, टेक्सास आणि व्हर्जिनियाचा समावेश आहे.

पेट्रोल १०० रुपयांच्या पलिकडे
देशात आज सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्यात. पेट्रोलमध्ये २६ पैसे प्रतिलिटर वाढ झाली, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३३ पैशांची वाढ झाली. सोमवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोल ९१.५३ रुपयांवर आणि डिझेल ८२.०६ रुपयांवर पोहोचले. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे गेली आहे.

रुग्णसंख्येत लक्षणीय घट, लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत बुधवारी निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या