दोहा : फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीचे भव्य उद्घाटन झाले. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात चुरशीचा सामना झाला. फिफा विश्वचषकात आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते. दीपिका पदुकोणदेखील या काही स्टार्सपैकी एक आहे. तिने वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण केले.
सध्या दीपिका पदुकोण ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वादात सापडली आहे. ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे दीपिका ही अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहे. सर्व वादांच्या दरम्यान फिफा विश्वचषक २०२२ चा फायनल पाहण्यासाठी ती पोहचली होती. या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.
१२ डिसेंबर रोजी पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाले. हे गाणे काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. गाण्यातील दीपिकाच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना भुरळ घातली. पण म्युझिक व्हिडिओच्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोण भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसली. भगव्या रंगाची बिकिनी घालून दीपिकाने त्यांच्या भावना दुखावल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.