इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्राच्या मुख्य अजेंड्यावर काश्मीरचा मुद्दा आणण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारींनी दिली आहे. यावेळी त्यांनी अडखळत भारताचा उल्लेख करत शेजारी असा शब्द वापरण्यापूर्वी आमचे मित्र असा उल्लेख केला. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत भुट्टोंनी ही कबुली दिली. तुम्ही बघितले असेल की, संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा अजेंड्यावर आणण्यात आम्हाला अडचणी येत आहेत असे भुट्टो म्हणाले.
भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. काश्मिरातून कलम ३७० हटविणे हे अंतर्गत प्रकरण असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्पष्टपणे म्हटले आहे. भारताने याविरोधातील सर्व प्रचार बंद करण्याचा सल्लाही दिला होता. भारताला पाकिस्तानसोबत दहशतवाद, शत्रूत्व आणि हिंसामुक्त वातावारणात सामान्य शेजा-यासारखे संबंध हवे असल्याचेही भारताने म्हटले होते.
भारताची टीका
पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंनी सुरक्षा परिषदेच्या चर्चेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने यावर टीका केली होती. अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराचे उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही असे उत्तर भारताने याला दिले होते. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी भुट्टोंचे विधान निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले होते.