18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध शक्य!

सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध शक्य!

एकमत ऑनलाईन

अ‍ॅमस्टरडॅम : लंडन क्वीसलँड विद्यापीठाचे डॉ. बेंजामिन पोप आणि नेदरलँड येथील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर, आपल्या आकाशगंगेत विविध ता-यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ता-याची निर्मिती होत असते, अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात. त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्रोत म्हणजे गुरु आणि शनीसारखे जे मोठे ग्रह आहेत. अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते. तेव्हा ग्रहांपासून मिळणा-या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती.

असे असताना काही लाल बटू तारे (ता-यांचा एक प्रकार, आपल्या सूर्यापेक्षा लहान आकाराचे तारे) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. यात रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरीक्षण केल्यावर संशोधकांच्या लक्षात आले की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ता-याभोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत. अर्थात इतर ग्रहाप्रमाणेच रेडिओ सिग्नल तयार होत असल्याचे समोर आले.

सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश शोधण्यासाठी अवकाश क्षेत्रातील संस्थांनी विविध क्षमतेच्या खास दुर्बिणी या पृथ्वीबाहेर अवकाशात पाठवल्या आहेत. उदा. नासाची हबल अवकाश दुर्बिण. अशा दुर्बिणींद्वारे विविध तरंगलांबीच्या माध्यमातून ता-यांचा अभ्यास करत पृथ्वीसदृश ग्रह हे शोधले जात आहेत. थोडक्यात पृथ्वीवरून सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश ग्रह शोधणे ही एक अशक्य गोष्ट होती. मात्र आता पृथ्वीवरूनच रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. यामुळे भविष्यात आणखी पृथ्वीसदृश ग्रह शोधून त्याचा अधिकाधिक अभ्यास करणे शक्य होणार आहे.

महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश तयार होतो आणि त्या माध्यमातून रेडिओ सिग्नलची निर्मिती होते. यातून पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध घेण्यास मदत होते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. अर्थात, पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याची नवी पद्धत विकसित झाल्याने आगामी काळात ग्रहांचा शोध घेणे सोपे होणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

१९ लाल बटू ता-यांचा अभ्यास
थोडक्यात सूर्यमालेत असलेल्या गुरु, शनि ग्रहांप्रमाणेच हे रेडिओ सिग्नल तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. या माध्यमातून आकाशंगंगेतील एकूण १९ लाल बटू ता-यांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी चार लाल बटू ता-यांकडून हे रेडिओ सिग्नल येत असल्याचे दिसून आले. म्हणजेच या ता-यांभेवती ग्रह तेही पृथ्वीसदृश ग्रह (ज्या ग्रहांवर वातावरण आहे) असल्याचे ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हंटले आहे.

जगातील शक्तिशाली दुर्बिणीतून पकडले सिग्नल
नेदरलँड येथील लो फ्रिक्वेन्सी अरे (लोफर) या जगातील सर्वांत शक्तीशाली रेडिओ दुर्बिणीने परग्रहावरून आलेले रेडिओ सिग्नल पकडल्याचा दावा संशोधकांनी केला असून, यासंदर्भातील संशोधन जगप्रसिद्ध नियतकालिक नेचरमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे खगोलप्रेमींची उत्सुकता ताणली गेली आहे. विशेष म्हणजे या पुढील काळात याबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता असून, नवनवे ग्रह शोधण्यास यातून मदत मिळणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या