Tuesday, September 26, 2023

तुर्की, ग्रीसला भूकंपाचा धक्का

नवी दिल्ली : तुर्की आणि ग्रीस मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम तुर्कीच्या किनाऱ्यावर शुक्रवारी ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार तुर्कीत झालेल्या भूकंपात अनेक इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने माहितीनुसार, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 6.9 असून त्याचा केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होता. तर अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7.0 इतकी होती. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार भूकंपाचे केंद्रस्थान एजियन समुद्रात 16.5 किमी खाली होते. भूकंपाची तीव्रता 6.6 नोंदवण्यात आली आहे.

तुर्कीतील स्थानिक मीडियाने या भूकंपानंतर घटनास्थळावरील काही व्हिडिओ टेलिकास्ट केले असून त्यात इमारतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की समुद्र किनारपट्टीच्या शेजारील शहरांमध्ये पाणी शिरल्याचं बोललं जात आहे.

ढिगाऱ्यातून जवळपास 70 जणांना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती इजमीरचे राज्यपाल यावूज सलीम कोसगार यांनी दिली. तसेच अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व हेलिकॉप्टरचे सहाय्य घेतले जात आहे. इजमीरमध्ये 38 रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि 35 बचाव दल कार्यरत आहेत. किमान 12 इमारतींमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. जानेवारीमध्ये तुर्कीच्या सिव्रीस येथे झालेल्या भूकंपात 30 हून अधिक लोक ठार तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यापूर्वी 1999 साली तुर्कीच्या इजमित शहरात भूकंपात 17000 नागरिक ठार झाले होते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या