न्यूयॉर्क : महागाईच्या वाढत्या आव्हानामुळे जगातील बहुतेक देश चिंतेत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक मंदीबाबत मोठे विधान केले आहे. भारत वगळता बहुतांश बड्या देशांना मंदीचा फटका बसेल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या मंदीचा फटका अमेरिकेला बसणार नाही असा दावा बायडेन यांनी केला आहे.
आर्थिक निर्देशकांच्या आधारे, ब्लूमबर्गने जगभरातील अर्थतज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात वरील दावा करण्यात आला आहे. यामध्ये आधीच आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेले अनेक आशियाई देश मंदीच्या गर्तेत सापडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, माझ्या मते, अमेरिका सध्या मंदीतून जात नाही. मात्र, अमेरिकेतील बेरोजगारीचा दर अजूनही इतिहासातील सर्वात कमी म्हणजेच ३.६ टक्के एवढा आहे. या सर्व परिस्थितीत आम्ही गुंतवणूक करणा-यांचा शोधात असल्याचे म्हटले आहे. माझी आशा आहे की, आपण या वेगवान विकासापासून एका स्थिर विकासाकडे जाऊ. यामुळे अर्थव्यवस्थेत थोडी मंदी दिसून येऊ शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की अमेरिकालाही मंदीचा फटका बसेल.
सर्वेक्षणात नेमके काय?
ब्लूमबर्गने केलेल्या सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये मंदीची २० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेत ४० टक्के तर, युरोपमध्ये मंदीचा ५५ टक्के फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगातील मध्यवर्ती बँका व्याजदरात मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे मंदीचा धोका वाढल्याचे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. या सर्वामध्ये युरोप आणि अमेरिकेपेक्षा आशियाई देशांची अर्थव्यवस्था लवचिक असून ढोबळ मानाने, आशियाई देश मंदीत येण्याची शक्यता २० ते २५ टक्के आहे.
लहान देशांना कमी धोका
सर्वेक्षणात लहान देशांना मंदीचा धोका कमी प्रमाणात बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलो. त्यानुसार न्यूझीलंड ३३ टक्के, द. कोरिया २५ टक्के, जपान २५ टक्के, हाँगकाँग २० टक्के, ऑस्ट्रेलिया २० टक्के, तैवान २० टक्के, पाकिस्तान २० टक्के, मलेशिया १३ टक्के, व्हिएतनाम १० टक्के, थायलंड १० टक्के, फिलीपीन ०८ टक्के, इंडोनेशियाला ०३ टक्के मंदीचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
श्रीलंकेला सर्वाधिक फटका
सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, या मंदीच्या संकटाचा सर्वाधिक फटका श्रीलंकेला बसणार आहे. त्यानुसार वर्षअखेरीस किंवा पुढील वर्षी श्रीलंकेत मंदी येण्याची ८५ टक्के शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात श्रीलंका मंदीच्या गर्तेत येण्याची शक्यता केवळ ३३ टक्के होती.