वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात रविवारी सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. त्यात १० पेक्षा जास्त जण ठार झाल्याची भीती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार चिनी नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री शेकडो नागरिक मोंटेरी पार्क भागात जमले होते. तिथे ही घटना घडली. यावेळी झालेल्या बेछूट गोळीबारात १० पेक्षा जास्त ठार झाले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जवळपास १० जण ठार, तर १९ जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही. काही सोशल मीडिया अकाउंट्सवर ही घटना वर्णद्वेषातून घडल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक नागरिक व आशियाई कम्युनिटीच्या नागरिकांत हा हिंसाचार झाला.
मृतांमध्ये एक महिला व तिच्या ६ महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. याशिवाय १७ वर्षांचा एक चिनी वंशाचा तरुणही यात मारला गेला. पोलिस लवकरच या घटनेविषयी अधिकृत निवेदन जारी करणार आहेत. येथे गत २ दिवसांपासून हा फेस्टिव्हल सुरू होता. विशेष म्हणजे या भागात यापूर्वीही स्थानिक श्वेतवर्णीय व आशियाई समुदायातील नागरिकांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी अशाच एका घटनेत ५ जणांचा बळी गेला होता.
हजारोंच्या संख्येने गर्दी
गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्यामुळे काहीवेळापर्यंत हा गोळीबार झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. अनेकांना ही आतषबाजी असल्याचे वाटले. पण नंतर जखमी जीवाच्या आकांताने पळत असल्याचे पाहून वस्तुस्थिती लक्षात आली. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबार झाला, तेव्हा घटनास्थळी हजारोंची गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.