नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात विविध प्रकरणांवरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. या सर्व घटनांमध्ये सोशल मीडियावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मत व्यक्त केले जात आहे. मात्र, यामध्ये द्वेषमूलक मतांचा भरणा अधिक होता. यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली.
फेसबुकने भारतात १.७५ कोटींहून अधिक आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी ३७ लाख पोस्ट या हिंसाचाराला चिथावणी देणा-या आहेत.
फेसबुकने मे २०२२ मध्ये केलेल्या पोस्टचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याअंतर्गत १३ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसा, छळ, ग्राफिक्स, दबाव, मुलांना धोक्यात आणणे आदींसह इतर गोष्टींबाबत हिंसक पोस्टवर सर्वात कठोर कारवाई करण्यात आली आहे.
यासर्व पोस्टप्रकरणी फेसबुकला १ ते ३१ मे या कालावधीत ८३६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर या सर्व तक्रारी गांभीर्याने घेत फेसबुकने पावले उचलली.
इन्स्टाग्राम, ट्विटरची कारवाई
फेसबुक पाठोपाठ भारतातील आक्षेपार्ह पोस्टवर इंस्टाग्राम आणि ट्विटरनेही कारवाईचा बडगा उचलला आहे. मेटा प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने १२ श्रेणींमध्ये सुमारे ४१ लाख पोस्टवर कठोर कारवाई केली. भारतातील आक्षेपार्ह पोस्टसाठी ट्विटरकडे २६ एप्रिल ते २५ मे २०२२ पर्यंत दीड हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर ट्विटरकडून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणारे ४६,५०० ट्विटर खाती निलंबित करण्यात आली आहेत.