क्वालालंपूर : वृत्तसंस्था
राजकारणात कधी काय होईल याचा कधीच नेम लावता येत नाही. याला दुजोरा देणारी अशीच एक घटना ९४ वर्षीय माजी पंतप्रधांनाची झाली आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हा वाईट प्रसंग मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्यावर ओढवला आहे. त्यांना बेरसातू पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पक्षातील इतर ४ जणांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. यात महाथिर यांच्या मुलांचाही समावेश आहे. महाथिर यांनी पक्षाध्यक्षांच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले.
बेरसातू पक्ष सध्या सत्तेत आहे. विशेष म्हणजे महाथिर यांनी काश्मीर मुद्यावरून अनेकवेळा गरळ ओकली आहे. मलेशियातील सत्ता संघर्ष आणि सत्तापक्षातील दुफळी उफाळून आली आहे. मलेशियातील सत्ताधारी पक्ष बेरसातूचे अध्यक्ष आणि पंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांनी माजी अध्यक्ष आणि पक्षाचे फाउंडर मेंबर असलेल्या महाथिर मोहम्मद, त्यांचा मुलगा मुखरीझ महाथिर यांच्यासह ४ जणांची पक्षातून हकालपट्टी केली. या निर्णयाला महाथिर यांनी आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते आपल्या संयुक्त व्यक्तव्यात म्हणाले, बेरसातू पक्षाच्या अध्यक्षांनी कोणतेही कारण न देता हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती पक्षातील निवडणुकीचा सामना करावा लागणार आणि आपले पद धोक्यात येणार या भीतीपोटी केलेली आहे. हे देशाला लाभलेले हे आतापर्यंतचे सर्वात अस्थिर पंतप्रधान आहेत.
Read More अमेरिकेची मध्यस्थी चीनने धुडकावली!
महाथिर यांचा मुलगा मुखरिझ महाथिर यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आव्हान दिले आहे. पण, कोरोना संकटामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले. विशेष म्हणजे २०१६ ला महाथिर आणि मुहिद्दीन यासीन यांनी मिळून बेरसातू पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर २०१८ ला त्यांना आघाडी सरकारच्या मार्फत सत्तास्थापन केली होती. मलेशियाच्या स्वातंर्त्यानंतर पहिल्यांदाच सत्तापरिवर्तन झाले होते.
पण, मुहिद्दीन यांनी माजी सरकारबरोबर हातमिळवणी करुन सत्ताधारी आघाडीचे बेरसातू सरकार पाडले. त्यामुळे दोन वेळा पंतप्रधानपद भुषवलेले महाथिर यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मलेशियाच्या राजाने महाथिर यांचा विरोध असतानाही मुहिद्दीन यांना पंतप्रधान केले. या सत्तासंघर्षापासूनच बेरसातू पक्षात दुफळी माजली आहे. दरम्यान, महाथिर यांनी त्यांच्याकडे अजूनही बहूमत असून ते मुहिद्दीन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचा दावा केला आहे.