ब्राझिलिया : कोरोनावरील लस घेतली, तर माणसे मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असे विधान करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आता लसीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीसाठी पत्र लिहिले आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे. भारताने कोरोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.
भारतात कोरोनाच्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असे आवाहन बोलसोनारो यांनी केले आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे.
भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचे पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे, असे बोलसोनारो यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुस-या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचे कटकारस्थान, तब्बल ४०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात