कोलंबो : आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेट राष्ट्रात इंधनाचे संकट अधिक गडद होत असताना श्रीलंका सरकारने सोमवारपासून एक आठवडा सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खासगी शाळेतील शिक्षकांना वीज पुरवठा समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले आहे.
डेली मिरर वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, देशात सध्या इंधनाचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्यामुळे श्रीलंकेवर परकीय चलनात आयातीसाठी पैसे देण्याचा दबाव आहे. श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
किमान कर्मचा-यांनाच कामाची मुभा
सार्वजनिक प्रशासन आणि अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, इंधन पुरवठ्यावरील निर्बंध, खराब सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि खासगी वाहनांच्या वापरातील अडचणी लक्षात घेऊन हे परिपत्रक किमान कर्मचा-यांसह काम करण्यासाठी जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी मात्र काम करीत राहतील.