न्यूयॉर्क : अमेरिकेत आलेल्या भीषण वादळामुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वारंवार येणा-या वादळामुळे अनेक शहरांतील उड्डाण रद्द करावी लागली. खराब हवामानामुळे सलग दुस-या दिवशी हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
‘फ्लाईटअवेअर’ च्या मते, शुक्रवारी ६००० हून अधिक उड्डाणे रद्द केली गेली आहेत. हवामान इतके खराब होते की, एकतर त्यांना रद्द करावे लागले किंवा त्यांनी उशिरानेउड्डाण केलं. यापूर्वी गुरुवारी १७०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर ८८०० हून अधिक उड्डाणे उशिराने झाली होती.
अमेरिकेत मिसीसिपी ते व्हर्जिनियापर्यंत चक्रीवादळ येत आहेत. त्यामुळे अटलांटा, शेर्लोट, वॉशिंग्टन, डीसी आणि न्यूयॉर्क येथील विमानतळांवर विमानांची गर्दी झाली आहे. दरम्यान, कोविड-१९ चा पुन्हा प्रसार झाल्यामुळे मोठ्या संख्येने एअरलाइन्स कर्मचारीही उपस्थित नाहीत.
एअरलाइन्सने गुरुवारी अमेरिकेतील १५०० हून अधिक उड्डाणे रद्द केली होती. न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर एक तृतीयांशपेक्षा जास्त उड्डाणे प्रभावित झालीत.
न्यू जर्सीजवळील नेवार्क लिबर्टी विमानतळावर एक चतुर्थांशहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, काही आठवड्यांपूर्वी एअरलाइन्सने मेमोरियल डे वीकेंडच्या आसपास पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे २८०० उड्डाणे रद्द केली होती.