ढाका : बांगलादेश आणि भारत ही क्रॉस-बॉर्डर बससेवा कोरोना महामारीमुळं गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली होती. मात्र, आज (शुक्रवार) पुन्हा ती सुरू करण्यात आली. आगरतळा-अखौरा आणि हरिदासपूर-बेनापोल मार्गे भारत-बांगलादेश बससेवा आज पहाटे ढाका येथून पुन्हा सुरु झाली. ढाका-कोलकाता-ढाका असा या बसचा मार्ग असणार आहे, बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी ही माहिती दिली.
२९ मे रोजी दोन्ही देशांमधील रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर ही सेवा सुरु करण्यात आली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, मार्च २०२० पासून दोन्ही देशांतील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. या दोन्ही गाड्या भारत-बांगलादेश असा प्रवास करतात. बंधन एक्सप्रेस कोलकाता आणि खुलना, बांगलादेश दरम्यान चालते, तर मैत्री एक्सप्रेस कोलकाता आणि ढाका मार्गे प्रवास करत असते.