बगदाद : श्रीलंकेतील राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक संकटामुळे तेथील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. श्रीलंकेतील सर्वसामान्य जनता काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती आणि त्यांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर कब्जा केला होता. श्रीलंकेसारखी परिस्थिती आता इराकमध्येही दिसून येत आहे. इराकमध्येही उग्र निदर्शने होत आहेत.
बगदादमधील संसद भवनावर आंदोलकांनी कब्जा केला. पंतप्रधानपदाचे उमेदवार मोहम्मद शिया अल-सुदानी यांच्या विरोधात ही निदर्शने होत आहेत. बहुतेक आंदोलक शिया नेते मुक्तदा अल-सदर यांचे समर्थक आहेत. अल-सुदानी हे माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर आहेत.
अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, संसद भवनात आंदोलक गाताना आणि नाचताना दिसत आहेत. इराकी संसदेच्या स्पीकरच्या डेस्कवर एक व्यक्ती झोपलेला दिसत असून विरोधकांनी संसद भवनात प्रवेश केला, तेव्हा एकही खासदार तिथे उपस्थित नव्हता. संसदेत सुरक्षा दल उपस्थित असतानाही त्यांनी आंदोलकांना रोखले नाही.
पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमींचा आंदोलकांना इशारा
पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांनी आंदोलकांना तातडीनं ग्रीन झोन सोडण्यास सांगितले. ग्रीन झोनमध्ये सरकारी इमारती आणि राजनैतिक मिशनची घरे आहेत. पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले की, राज्य संस्था आणि परदेशी मिशनच्या सुरक्षा व्यवस्थेचे कोणतेही नुकसान आंदोलकांकडून होत कामा नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.
पंतप्रधानांच्या इशा-यानंतर आंदोलक संसद भवनातून बाहेर पडत आहेत. तत्पूर्वी, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला. मात्र, तरीही अनेकांनी तोडफोड केली. आंदोलक ‘अल-सुदानी, आऊट’च्या घोषणाही देताना दिसत आहेत.