नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात कुवैतमध्ये आंदोलन करणा-या अनिवासी नागरिकांना प्रशासन पुन्हा मायदेशी माघारी पाठवणार आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कुवैतने भारतीय दूतावासाला समन्स धाडत खुलासा मागितला होता.
‘अरब टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आखाती देश कुवैतमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक काम करतात. नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेल्या व्यक्तींनी आंदोलन आणि मोर्चे काढणे हे बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील आंदोलन करण्यात आले. आता कुवैत प्रशासनाच्या अधिका-यांकडून या नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना डिपोर्टेशन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आणि तेथून मायदेशी धाडण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर या नागरिकांना पुन्हा कुवैतमध्ये येण्यास बंदी घातली जाणार आहे.