24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभविष्यात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढणार!

भविष्यात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : वाढते प्रदूषण आणि यातून वाढत जाणारे तापमान याचा थेट फटका मानव जातीला बसू लागला आहे. यातून एक तर नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढू लागले असून, भविष्यात ते अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. प्रदूषण वाढीचा वेग कायम राहिल्यास आशिया खंडाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण मुंबईसह आशिया खंडातील जवळपास ५० शहरे पाण्याखाली जाऊ शकतात, अशी भीती एका नव्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम समुद्राच्या पाणी पातळीवर दिसून येत आहे. कार्बन उत्सर्जनामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे.

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईसह देशातील प्रमुख शहरे समुद्राच्या पाणाखाली जातील. याशिवाय चीन, इंडोनेशिया, बंगलादेश आणि व्हिएतनामधील अ्नेक शहरेदेखील बुडतील, अशी भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. चीन, भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनामची लोकसंख्या जास्त आहे. या देशांमधील कोळशावर चालणा-या प्रकल्पांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळेच तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम याच देशांमध्ये पाहायला मिळेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

मानवी क्रियाकलापांमुळे प्रदूषणाचा प्रभाव विशेषत: कार्बन उत्सर्जन शतकांपासून वातावरणात राहतो. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. जर कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिले तर भविष्यात धोके वाढणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका खंडाला बसेल. या खंडाचा १० टक्के भाग पाण्याखाली जाईल. याशिवाय बेटांवर वसलेल्या देशांचे अस्तित्त्वच संपेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम हे कोळशावर चालणारे कारखाने उभारण्यात जागतिक स्तरावर आहेत. या देशांची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा सर्वात वाईट परिणाम या देशांमध्ये दिसून येईल, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. तेथील जमिनीचा दहावा भाग समुद्राच्या पाण्यात बुडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तापमानवाढ भारतासाठी दुहेरी संकट घेऊन येईल. एका बाजूला समुद्राची पाणी पातळी वाढून महत्त्वाच्या शहरांना धोका निर्माण होईल आणि दुस-या बाजूला हिमालयातील बर्फ वितळून पुराचे संकट निर्माण होईल. त्याचा फटका अनेक राज्यांना बसेल, असेही अहवालात म्हटले आहे.

समुद्राच्या पातळीवाढीचा १८४ ठिकाणांवर परिणाम!
यासंबंधीचा अभ्यास अलीकडेच क्लायमेट कंट्रोल नावाच्या साइटवर प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये भारतातील मुंबई धोक्यात दाखवण्यात आली आहे. खरे तर या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जगभरात सुमारे १८४ ठिकाणे आहेत. जिथे समुद्राच्या पातळीच्या वाढीचा थेट परिणाम होऊ शकणार आहे. या शहरांचा मोठा भाग किंवा अगदी संपूर्ण शहरे पाण्यात बुडाली जातील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

समुद्र किनारे लाभलेल्या देशांना सर्वाधिक फटका
समुद्र किनारे लाभलेल्या देशांना तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसेल. भरती येत असलेल्या भागांमधील १५ टक्के लोकसंख्येला तापमानवाढीचा फटका बसेल. क्लायमेट कंट्रोल नावाच्या संकेतस्थळावर याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

२०० ते २ हजार वर्षांत पृथ्वीचा नकाशा बदलेल
या अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, पुढील २०० वर्ष ते २००० वर्षांच्या दरम्यान पृथ्वीचा नकाशा बदलला असेल. कारण जर तापमान १.५ डिग्री सेल्सियसवरून ३ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले तर जगभरातील हिमनद्या वितळतील. हिमालयासारख्या पर्वतावरील बर्फ सखल भागांना पूर येईल. ज्यामुळे संपूर्ण जगाचा मोठा भाग समुद्राच्या वाढत्या पातळीत शोषला जाऊ शकतो. अर्थात बराच भूभाग गायब होऊ शकतो.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या