स्टर्लिंग : कोरोनापूर्वी, स्पॅनिश फ्लू आणि प्लेगसारख्या जागतिक महामारीने लाखो लोकांचा बळी घेतला. आता शास्त्रज्ञांनी प्लेगच्या साथीबद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस आणली आहे.
मध्यपूर्वेतील स्मशानभूमीत शेकडो वर्षांपूर्वी सापडलेल्या सांगाड्यांचे परीक्षण करून, शास्त्रज्ञांनी १४ व्या शतकात ब्लॅक डेथची महामारी कशी सुरू झाली, हे शोधून काढले आहे. उत्खननादरम्यान सापडलेल्या सांगाड्यांच्या डीएनए ६०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे उघड झाले. १४ व्या शतकात प्लेगच्या साथीने जगात प्रचंड विनाश घडवून आणला, त्यामुळे करोडो लोकांचा मृत्यू झाला होता.
पहिला प्लेग रुग्ण : स्कॉटलंडमधील स्टर्लिंग विद्यापीठ, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि ट्युबिंगेन विद्यापीठाच्या संशोधन पथकाने किर्गिझस्तानमधील स्मशानभूमीतून सापडलेल्या डीएनएचे विश्लेषण केले आणि असे आढळले की मध्य आशियामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. शेकडो वर्षांपूर्वी येथे पुरलेल्या लोकांच्या दातांमध्ये प्लेग निर्माण करणा-या जीवाणूंचा डीएनए संशोधकांना सापडला.
मानवाने केला प्लेगचा प्रसार : जर्नल नेचरमध्ये या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासाचे सह-लेखक आणि स्टर्लिंग युनिव्हर्सिटीचे इतिहासकार फिलिप स्लाव्हिन म्हणाले की, आमच्या शोधानंतर प्लेगच्या महामारीबद्दल शतकानुशतके जुने वाद आणि सिद्धांत अप्रासंगिक ठरले आहेत. ही महामारी उंदरांच्या माध्यमातून नव्हे तर मानवाच्या माध्यमातून जगभर पसरली.
अभ्यास पथकाच्या मते, ही महामारी शेकडो वर्षांपासून लोकांचा बळी घेत आहे. एका अहवालानुसार, शेकडो वर्षांपूर्वी लंडनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी मृतदेह पुरण्यासाठी मोठी जागा सोडण्यात आली होती. प्लेग ज्या शहरात पसरला, तेथील ५०-६० टक्के लोकसंख्या नष्ट झाली. या महामारीमुळे सर्वाधिक मृत्यू युरोप आणि मध्य पूर्वमध्ये झाले. इराण आणि मध्य आशियातील लाखो लोकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले.