33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय नद्यांमधून होतोय समुद्रात प्लास्टिकचा कचरा

नद्यांमधून होतोय समुद्रात प्लास्टिकचा कचरा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्लास्टिक हा पदार्थ हजारो वर्षांनंतरही कुजत नाही. जगात बहुसंख्य देशातून कचरा नद्यांमधून वाहत समुद्रात जमा होतो. त्याचबरोबर प्लास्टिकचा कचराही जमा होतो. एका अहवालानूसार दरवर्षी समुद्रात तब्बल ८ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा जमा होतो. समुद्रात जमा झालेल्या या प्लास्टिकच्या महासागराचा समुद्रातील प्राण्यांना प्रचंड धोका निर्माण झाला आहे.

एक्सपोर्ट ऑफ प्लास्टिक डेब्रिस बाय रिव्हर्स इन टू सी या शीर्षकांतर्गत एक जागतिक अहवाल प्रकाशित झाला आहे. अहवालानूसार समुद्रात प्लास्टिक जमा करण्यात चीनचा सर्वाधिक वाटा असून चीनमधील चांग जियांग (यांगत्से) ही नदी सर्वाधिक म्हणजे तब्बल १.४६९ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात जमा करते. त्यानंतर सिंधू नदीतून १६४००० टन व चीनमधीलच यलो रिव्हरमधून १२४००० टन प्लास्टिक समुद्रात जमा होते. सिंधू नदीचा फारच थोडा भाग भारतातून वाहतो. त्यातही ज्या भागातून ही नदी भारतात वाहते, तेथे मानवी वस्ती नगण्य आहे. तिचा बहुतांश प्रवास ती पाकिस्तानातून करते.

त्यामुळे चीनपाठोपाठ पाकिस्तानमधून समुद्रात सर्वाधिक प्लास्टिक कचरा जमा होतो. भारतातून वाहणा-या गंगा,ब्रह्मपुत्रा व यमुना या ३ नद्यांमधून मिळून ८० हजार टन प्लास्टिक समुद्रात जमा होते. त्याशिवाय मेकॉंग, झिजियांग या बहुतांश प्रवास चीनमधून करणा-या नद्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा होतो.

समुद्रात प्लास्टिकचा कचरा जमा करण्यासाठी मोठा हातभार लावणा-यांमध्ये आशियातील राष्ट्रांची मोठी संख्या आहे. चीन, इंडोनेशिया, थायलंड,फिलिपाईन्स, व्हिएतनाम या देशांमधून समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होते. तर अमेरिका, जपान तसेच अनेक युरोपीय देशांनी याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे.

समुद्री जीवांना धोका
समुद्रातील प्लास्टिकमध्ये अडकून अनेक समुद्री जीव मरतात. तसेच प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे अन्न म्हणून गिळण्यामुळेही त्यांची आतडी जायबंदी होऊन ते मरतात.

समुद्री जीवांच्या मांसातही सापडते प्लास्टिक
प्लास्टिकचे तुकडे गिळल्यानंतर समुद्री जीव काही लगेच मरत नाहीत. अशातच ते मच्छिमारांच्या जाळयात सापडल्यानंतर त्यांच्यापासून पदार्थ बनविताना त्यातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडत आहे. खेकडे, झिंगे यांच्यामध्ये प्रतिग्रॅम ०.१ ते ८.६ कण सापडतात तर माशांमध्ये प्रतिग्रॅम २.९ कण सापडतात असे आढळून आले आहे.

नद्यांमधून जमा होणारे प्लास्टिक
नदी//प्रमाण (टनांमध्ये)
यांगत्सी//१४६९४८१
सिंधू//१६४३३२
पिवळी (यलो)//१२४२४९
हवोई//९१८५८
नाईल//८४७९२
गंगा,यमुना,ब्रह्मपुत्र//७२८४५
झिजियांग//५२९५८
कामा//३८२६७
नायझर// ३५१९६
मेकॉंग//३३४३१

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या