वॉशिंग्टन : कोरोना झाल्यानंतर रुग्णांना न्यूमोनिया होत असेल तर तो जीवघेणा असल्याचा शोध अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनमधील शास्त्रज्ञांनी लावला आहे़ यामुळे भविष्यातील येणा-या रोगांवर वेळीच नियंत्रण आणता येणार आहे़ कोरोना संसर्गाचे थैमान सुरू असताना त्याला अटकाव करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे कोरोनाच्या विषाणूवर आणि आजारावरही संशोधन सुरू आहेत. या संशोधनातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर विषाणूंमुळे न्यूमोनिया झालेले रुग्ण यांच्या फुफ्फुसांचा अभ्यास करून कोरोनामुळे हानी का जास्त होते, हे शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
नेचर या जर्नलमध्ये यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. रुग्णाच्या फुफ्फुसात विविध ठिकाणी इम्यून सेलवर कोरोना विषाणू कब्जा करतो आणि नंतर विविध अवयवांना धोका पोहोचवतो, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. शास्त्रज्ञांनी ८६ व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या फुफ्फुसातील द्रवाचे विश्लेषण केले. त्याची तुलना इतर विषाणूमुळे न्यूमोनिया झालेल्या आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या २५६ रुग्णांच्या फुफ्फुसातील द्रवाशी केली. संशोधन करण्यात आलेले रुग्ण खूपच आजारी होते. त्यांना बरे होण्यास बराच वेळ लागणार आहे. मात्र, रोगप्रतिकारशक्ती सक्षम असेल, तर मृत्यूदर वीस टक्क्यांपर्यंत खाली आणता येईल. अन्यथा तो चाळीस टक्क्यांपर्यंत जाईल, असे संशोधनातील सहलेखक स्कॉट बडिंजर यांनी सांगितले.
कोरोनाचा इम्यून सेलवर कब्जा
शास्त्रज्ञांनी गंभीर कोरोनाग्रस्तामध्ये विषाणूचा प्रसार कसा होतो हे अभ्यासून त्याची तुलना इतर विषाणूंनी न्यूमोनिया झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांशी केली. त्यात कोरोना विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसात विविध ठिकाणी इम्यून सेलवर कब्जा करतो आणि श्वसनमार्गापर्यंत पसरतो. हा कालावधी काही दिवस, आठवड्यांचाही असू शकतो.
आजाराचे स्वरूप गंभीर होताहेत
संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये हळूहळू पसरतो. रुग्णाला ताप येतो. रक्तदाब कमी होतो. किडनी, मेंदू, हृदय आणि इतर अवयवांना हा विषाणू इजा पोहोचवतो. इतर विषाणूंमुळे होणा-या न्यूमोनियाशी तुलना करता पूर्वीपासून एखादा आजार असल्यामुळे कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराचे स्वरूप गंभीर होत असावे, असे मत अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनमधील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.